चारित्र्यमाला २: कृतज्ञता, सहिष्णुता, आणि चिकाटी

चारित्र्य म्हणजे काय? व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य समानार्थी शब्द आहेत का? चारित्र्याचे पैलू कोणते? व्यक्तींना आणि समाजाला चारित्र्याची गरज आहे का? चला जाणून घेऊया. 

आपण सहसा जसे वागतो ते झाले आपले व्यक्तिमत्त्व. परंतु एखाद्या अवघड प्रसंगी किंवा आपला कस लागतो त्या क्षणी आपण जसे वागतो ते आपले चारित्र्य. 

मूळ स्वभाव शांत असणे हे झाले व्यक्तिमत्त्व. परंतु सहसा शांत स्वभाव असला तरीही प्रचंड चिडचिड होत असताना दुसऱ्याशी शांतपणे बोलणे, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे झाले चारित्र्य.

चारित्र्यवान व्यक्ती चारित्र्यपूर्ण समाज घडवतात.

चारित्र्याचे अनेक पैलू आहेत. त्यातले नऊ पैलू आपण या छोट्या छोट्या लेखांमधून जाणून घेऊया.

दुसऱ्या भागात बघूया कृतज्ञता, सहिष्णुता, आणि चिकाटी. 

कृतज्ञता अर्थात Gratitude

तुमच्या ताटातले अन्न कोणाकोणामुळे तुमच्यापर्यंत पोचते? सर्वशक्तीशाली निसर्ग, शेतकरी, श्रमिक, मालवाहतूकदार, दुकानदार, घरातील अन्नपूर्णा, सर्व कमावते सदस्य, मदतनीस, आणि कितीतरी ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे हात लागतात तेव्हा ताटामध्ये रोजचे अन्न येते.

हाच विचार उठण्यापासून झोपण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दल केला तर आपण स्वयंपूर्ण, self-made आहोत हा अहंकार क्षणात गळून पडतो.

अशावेळी इतरांप्रती जी ऋणाची जाणीव निर्माण होते तिचे नाव कृतज्ञता!

कृतज्ञता म्हणजे आपल्या अवतीभोवती पुरून उरलेला जो चांगुलपणा आहे त्याची विनम्र जाणीव. आपल्या आयुष्यातील एखादी गोष्ट कमी केल्यावर तिचे आपल्या जीवनातील महत्त्व समजणे म्हणजे कृतज्ञता.

कृतज्ञता माणसामाणसांमधील नाती आणि माणसाचे निसर्गाशी असलेले नाते घट्ट करते. आयुष्य सुंदर आणि सुखी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मनातली कृतज्ञता वाढवणे आणि तो वेळोवेळी व्यक्त करणे.

माग आज तुम्ही कोणाला धन्यवाद देणार? कोणासाठी एखादी भेटवस्तू घेणार? एखादे पत्र? एखादी छोटी चिठ्ठी? एखादा मेसेज?

कृतज्ञता हा समाजाला बांधून ठेवणारा फेवीकॉल आहे. तो जपूया.. वाढवूया..

सहिष्णुता अर्थात Tolerance

आपल्या डोक्यात जाणारी कोणतीही व्यक्ती मनात आणा. ज्याचे विचार आपल्याला बिल्कुल पटत नाहीत अशा नेत्याचे एखादे भाषण आठवा. अशी एक तीव्र चीड निर्माण होते ना? स्वाभाविक आहे.

भिन्न किंवा अगदी विरुद्ध मताचाही आदर करण्यासाठी लागणारी विशेष आंतरिक शक्ती म्हणजे सहिष्णुता किंवा सहनशीलता.

त्या व्यक्तीचे, गटाचे, समुदायाचे आपल्याला काहीही, अगदी काहीही, पटले नाही तरी त्यांच्या माणूस असण्याचा, त्यांच्या अस्तित्वाच्या अधिकाराचा, त्यांचे वेगळे मत असू शकते याचा सन्मान करणे म्हणजे सहिष्णुता.

घरात येणाऱ्या नववधूने आपल्याच घरच्या पद्धतींनुसार वागले पाहिजे असे वाटणे ही असहिष्णुता. आपल्या नावडत्या पक्षाला मत देतो म्हणून एखाद्याशी बोलणे सोडणे ही असहिष्णुता.

दुसऱ्याचे वेगळेपण आपण मान्य करतो तेव्हाच आपले त्यांच्यापासून वेगळे असणे त्यांना मान्य असावे अशी अपेक्षा आपण करू शकतो. त्यातूनच गटागटातील आणि समाजातील सौहार्द टिकून राहते, वाढीस लागते. आणि ही अपेक्षा समाजातील सर्वांकडून असली तरच समाजाचे स्थैर्य टिकून राहते.

शिकागोच्या प्रसिद्ध भाषणात विवेकानंद म्हणतात, “मला अभिमान आहे की मी अशा धर्माशी जोडलेला आहे ज्याने जगाला सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता शिकवली.”

सहिष्णुतेची हजारो वर्षांची परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. तो आपला DNA आहे. असहिष्णुता बाळगणे म्हणजे आपली ओळख, आपले व्यक्तित्त्व सोडण्यासारखे आहे. भारतप्रेमी मंडळींनी हे विसरणे याहून मोठी चूक असू शकणार नाही.

चिकाटी अर्थात Perseverance

डोंगर चढताना दम लागला म्हणून अर्ध्यातूनच परत जाऊ असं कधीतरी वाटलं असेल ना? सुरू केलेली एखादी गोष्ट (उदा. जिम) आता जमेनाशी वाटायला लागल्यावर बंद केली असेल ना?

गोष्टी कठीण व्हायला लागल्यावर त्या सोडून देण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे. ज्यात त्रासच जास्त होतोय अशी गोष्ट करत राहण्यात काय अर्थ आहे असं वाटणं नैसर्गिक आहे.

पण कितीही अडचणी आल्या, कोणी नाउमेद केलं, किंवा यश मिळायला खूपच वेळ लागतोय असं वाटायला लागलं तरीही हताश न होता त्या कामाला अक्षरशः चिकटून राहणे म्हणजे चिकाटी.

मी हे कोणत्या मोठ्या ध्येयासाठी करतो आहे याचा विचार केला की चिकाटी आपोआप जमायला लागते. आरोग्य हवे आहे? मग व्यायाम चिकाटीने केला पाहिजे. उत्कर्ष हवाय? मग कष्टाला पर्याय नाही.

हातची गोष्ट सोडून द्यावीशी वाटली तर डोळ्यासमोर यशाची कल्पना करून पाहू. डोंगरावरून खालचे गाव किती सुंदर दिसेल याचं चित्र मनात रंगवलं म्हणजे थकवा विसरून पुढे चालता येते.

तर कधी मोठे वाटणारे उद्दिष्ट छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वाटून एका वेळी एकेक तुकड्याचा विचार केला की मोठ्या वाटणाऱ्या उद्दिष्टाला चिकटून राहणे सोपे वाटायला लागते.

तर इतर वेळेस आजूबाजूच्या लोकांमुळे आपल्याला धीर येतो. काही वेळेस आपण इतरांना धीर देतो. एकमेकांना धीर देणारा, एकमेकांचा उत्साह वाढवणारा समाज चिकाटीने पुढे जातो. एकमेकांना मागे खेचणारे खेकडे मात्र कायम टोपलीतच राहतात.

पुढच्या भागात बघूया विनयशीलता, क्षमाशीलता, आणि नैतिकता. 

भाग १ भाग ३

To read more about character in English, read my interviews here: Part 1, Part 2

Published by Aakash Chowkase

I'm a passionate educator and researcher. I study talent development and social-emotional learning. I began teaching as a weekend activity and made it my career when I found my calling in it. I believe education is the best path to make our world a better place.

Leave a comment