चारित्र्यमाला १: धैर्य, करुणा, कृतज्ञता

चारित्र्य म्हणजे काय? व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य समानार्थी शब्द आहेत का? चारित्र्याचे पैलू कोणते? व्यक्तींना आणि समाजाला चारित्र्याची गरज आहे का? चला जाणून घेऊया. 

आपण सहसा जसे वागतो ते झाले आपले व्यक्तिमत्त्व. परंतु एखाद्या अवघड प्रसंगी किंवा आपला कस लागतो त्या क्षणी आपण जसे वागतो ते आपले चारित्र्य. 

मूळ स्वभाव शांत असणे हे झाले व्यक्तिमत्त्व. परंतु सहसा शांत स्वभाव असला तरीही प्रचंड चिडचिड होत असताना दुसऱ्याशी शांतपणे बोलणे, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे झाले चारित्र्य.

चारित्र्यवान व्यक्ती चारित्र्यपूर्ण समाज घडवतात.

चारित्र्याचे अनेक पैलू आहेत. त्यातले नऊ पैलू आपण या छोट्या छोट्या लेखांमधून जाणून घेऊया.

पहिल्या भागात बघूया धैर्य, तदनुभूती, आणि करुणा. 

धैर्य अर्थात Courage

कोणाच्या मनात भीती नसते? जवळच्या माणसाची काळजी वाटणं, भविष्याची चिंता वाटणं, आपल्याला किंवा जवळच्या माणसाला दुखापत होऊ नये असं वाटणं साहजिकच आहे.

परंतु काही वेळेस आपलं मन या आंतरिक भीतीपेक्षाही मोठी साद आपल्याला घालत असतं. डोळ्यासमोर काहीतरी चुकीचं घडतंय हे पाहून त्रास होत असतो. कोणावर अन्याय होतोय, एखाद्याची फसवणूक होतीये हे पाहून पेटून उठून तो अन्याय दूर करावा असं वाटत असतं.

अशा वेळी मनात भीती असो किंवा भविष्याची चिंता, अन्यायाविरूद्ध पेटून उठावंसं वाटतं, आणि कळत नकळत हातातून कृती घडते.

ती कृती, ती अनामिक ऊर्जा म्हणजेच धैर्य!

एक निरोगी समाज उभा असतो तो अशा धैर्यावर.. आणि जेव्हा समाजाचे, त्यातल्या व्यक्तींचे धैर्य ढासळते, तेव्हा तो समाज ढासळलाच समजा. अशा मेंढरांच्या कळपासमान समाजाचे अध:पतन कोणीही टाळू शकत नाही.

तदनुभूती अर्थात Empathy

“कुछ कुछ होता है” मधल्या राहुल आणि टिनाच्या प्रेमासाठी त्याग करणारी अंजली बघताना अंजलीसोबत तुमच्याही डोळ्यात पाणी आलं होतं ना? “दंगल” मधल्या मुलींची पाणीपुरी बंद करायला लावणाऱ्या निर्दयी बापाला बघून तुमच्याही हृदयाला त्रास झाला होता ना?

आभासी सिनेमामधल्या भावनिक क्षणी आपण नकळत कसे काय बरं भावनिक होतो? समोरच्याच्या दुःखात आपणही दुःखी होणं सहज कसं काय बरं घडतं? एखाद्याच्या हसण्यात आपोआप आपल्या गालावर हसू कसं काय उमटतं?

समोरच्याच्या भावनांचे प्रतिबिंब आपसूकपणे आपल्या मनात पाडणारी विलक्षण शक्ती म्हणजे आपली तदनुभूती!

मेंदूतील “मिरर न्यूरॉन्स” फायर करणारी ही जन्मजात उपजत व्यवस्था आपल्याला अतिशय बलवान बनवते. समोरच्याला नेमकं काय वाटत असेल.. त्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू असेल, याचा अंदाज बांधण्यासाठी या गुणाचा आपण अक्षरशः पदोपदी वापर करत असतो.

अर्थातच, एखाद्या समाजात जेवढी अधिक तदनुभूती, तेवढा तो समाज समंजस आणि प्रगल्भ असतो. जिथे तदनुभूती घसरली तिथे निर्दयतेचे आणि अन्यायाचे राज्य चालते.

करुणा अर्थात Compassion

आंधळ्या व्यक्तीला तुम्ही रस्ता ओलांडायला मदत केली आहे का? आजीबाईला तिची जड पिशवी तुम्ही उचलून दिली आहे का?

तुम्ही अंध नसाल, आजीबाई इतके वयस्कर नसाल तरीही तुम्हाला त्यांना मदत का करावीशी वाटली? दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखाचा तुम्हाला स्वतःला अनुभव नसेल तरीही ते दुःख आणि त्रास कमी करण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये आपोआप तयार होते.

कोविडचा रुग्ण असलेल्या घरात मदत पोचवायला आपल्याला कोविड होण्याचा अनुभव लागत नाही. घरातल्या महिलेचे कष्ट दिसायला आपल्याला महिला असण्याची गरज पडत नाही. ती अट तदनुभूतीला (empathy) आहे; करुणेला नाही!

तदनुभूतीच्या मर्यादांना ओलांडून पलीकडे नेणारी जी जादुई ताकद आपल्यापाशी आहे तिचे नाव करुणा!

दुसऱ्याच्या दुःखाकडे लक्ष असणे (mindfulness), आपणही कधीतरी समोरच्याच्या जागेवर असतो हे समजून माणसामाणसातील वैश्विक नाते समजणे (common humanity), आणि त्या जाणिवेतून समोरच्याला मदत करणे (kindness) म्हणजे करुणा.

संपूर्ण समाज करुणेच्या इंधनावर चालतो. रोज अनेकांच्या करुणेवर आपण जगतो. आणि आपल्या करुणेवर इतर समाज. ही करुणा आपल्याला आणि आपल्या जगाला सुंदर बनवते.. मानवी बनवते. करुणा आटली म्हणजे माणुसकी संपली असे समजावे.

पुढच्या भागात बघूया कृतज्ञता, सहिष्णुता, आणि चिकाटी. 

भाग २ भाग ३

To read more about character in English, read my interviews here: Part 1, Part 2

Published by Aakash Chowkase

I'm a passionate educator and researcher. I study talent development and social-emotional learning. I began teaching as a weekend activity and made it my career when I found my calling in it. I believe education is the best path to make our world a better place.

Leave a comment