चारित्र्य म्हणजे काय? व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य समानार्थी शब्द आहेत का? चारित्र्याचे पैलू कोणते? व्यक्तींना आणि समाजाला चारित्र्याची गरज आहे का? चला जाणून घेऊया.
आपण सहसा जसे वागतो ते झाले आपले व्यक्तिमत्त्व. परंतु एखाद्या अवघड प्रसंगी किंवा आपला कस लागतो त्या क्षणी आपण जसे वागतो ते आपले चारित्र्य.
मूळ स्वभाव शांत असणे हे झाले व्यक्तिमत्त्व. परंतु सहसा शांत स्वभाव असला तरीही प्रचंड चिडचिड होत असताना दुसऱ्याशी शांतपणे बोलणे, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे झाले चारित्र्य.
चारित्र्यवान व्यक्ती चारित्र्यपूर्ण समाज घडवतात.
चारित्र्याचे अनेक पैलू आहेत. त्यातले नऊ पैलू आपण या छोट्या छोट्या लेखांमधून जाणून घेऊया.
तिसऱ्या भागात बघूया विनयशीलता, क्षमाशीलता, आणि नैतिकता.
विनयशीलता अर्थात Humility
एखाद्या प्रश्नाचे खात्रीशीर उत्तर माहीत नसताना देखील तुम्ही उत्तर ठोकून दिले आहे का? किंवा आपली चूक झाली आहे हे माहीत असूनही ती मान्य करणे तुम्हाला जड गेले आहे का?
आपल्या जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू माहीत असणे, आपल्याला कमी ज्ञान आहे अशा गोष्टीतले अज्ञान मान्य करणे, इतरांच्या क्षमतांचा आदर करणे, आणि आपल्याला चांगल्या जमणाऱ्या गोष्टींवरून इतरांना कमी न लेखणे म्हणजे विनयशीलता.
विनयशील व्यक्ती अगदी लहान मुलांना सुद्धा प्रिय वाटतात. अशा व्यक्ती समोरच्याचे म्हणणे ऐकून घेतात; आपले मत बदलायचा मोकळेपणा दाखवतात.
त्याउलट स्वतःचेच मत रेटणारे, माहिती न घेता बोलणारे लोक उथळ आणि दीडशहाणे मानले जातात.
परंतु विनय बाळगणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे असे नाही. आपल्या क्षमतांची योग्य ओळख असणे, ना-कम-ना-ज्यादा, हे विनयाचे प्रमुख लक्षण आहे.
दुसऱ्यावरचा प्रकाश स्वतःकडे ओढून घेणारे, स्वतःलाच स्वतःच्या नावाने संबोधणारे, “चुकीचे बोल पण रेटून बोल”अशा मंत्राला जागणारे, “मला पहा फुले वहा” म्हणणारे लोक, विशेषतः नेते मंडळी, आपल्याभोवती कायम दिसतात.
आणि ते जरी आपल्या विचारांचे असले तरी सुद्धा अशांपासून सावध राहणे हे आपल्या आणि समाजाच्या हिताचे असते. फाजील आत्मविश्वासाने ग्रस्त आणि “ग” ची बाधा झालेल्या विनयहीन व्यक्ती स्वतःसोबत दुसऱ्यालाही घेऊन बुडण्याची शक्यता असते.
क्षमाशीलता अर्थात Forgiveness
अनेक वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने केलेला अपमान अजूनही तुमच्या मनात “rent-free” राहत असेल ना? “नडला म्हणजे तोडला” असं काहीसं फिल्मी कधीतरी वाटत असेल ना?
घटना कितीही जुनी असली तरी तिच्याशी निगडित नकारात्मक भावना दीर्घकाळ टिकतात. एखाद्याने आपल्याला त्रास दिला असेल, अन्याय केला असेल, धोका दिला असेल, तर राग, सूडभावना मनात घर करणं अगदी स्वाभाविक आहे.
पण या नकारात्मक भावनांचा विषारी पसारा शरीर-मनात सतत वाढत राहिला, तर त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात. म्हणून योग्य वेळेत या भावनांचा निचरा होणे आवश्यक आहे.
आपल्याला इजा करणाऱ्याबद्दल मनात धरलेला राग वा सूडभावना जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक सोडून देणे म्हणजे क्षमाशीलता.
क्षमा करणे म्हणजे त्यांच्या चुकीला मान्यता देणे किंवा त्याचे गांभीर्य कमी करणे नव्हे; आणि त्यांच्या कृतीकडे डोळेझाक करून ती विसरणे तर अजिबातच नाही.
खरं तर क्षमा केल्याने आपणच स्वतःवरचं ओझं हलकं करतो. राग धरून स्वतःचं नुकसान करत राहण्यापेक्षा क्षमा करून त्या ओझ्यातून मुक्त होणं अधिक शहाणपणाचं ठरू शकतं.
एखाद्याला क्षमा करणं याहून मोठा आणि अवघड दयाळूपणा दुसरा कोणता असू शकतो? पण अवघड आहे म्हणूनच प्रयत्न करण्याला खरा अर्थ आहे, नाही का?
समोरच्यावरचा राग आपल्या मानसिक शांतीपेक्षा, आरोग्यापेक्षा महत्त्वाचा नाही हे एकदा लक्षात आलं की क्षमा करणं सोपं होतं. पुढे त्या व्यक्तीशी नातं ठेवायचं की नाही, हा वेगळा प्रश्न आहे; पण त्या रागाच्या ओझ्यातून मुक्त होणं मात्र अत्यावश्यक आहे. मग करणार प्रयत्न?
नैतिकता* अर्थात Integrity
चौकात पोलिस नाहीये म्हणून लाल सिग्नल तोडून पुढे जायचा मोह तुम्हाला कधी झाला आहे का? सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याचे पैसे तुम्हाला सापडल्यावर ते स्वतःकडे ठेवून घेण्याची इच्छा तुम्हाला झाली आहे का?
कोणी बघत नसतानाही योग्य गोष्ट करणे म्हणजे integrity. बोलण्यात आणि वागण्यात अंतर नसणे म्हणजे integrity. बाहेरच्या धाकाने नाही तर आतल्या हाकेने योग्य तेच करेन म्हणजे integrity!
वर्गात पर्यवेक्षक असोत किंवा नसोत, मी कॉपी करणार नाही.. बॉस सुट्टीवर असली तरी वेळेवर कामावर हजर राहीन.. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळीन.. म्हणजे integrity.
आपल्यातल्या अनेकांना “चलता है” वृत्तीची बाधा झाली आहे. लाच देणे, खोटे दाखले बनवणे, “वरून” दबाव आणणे, डेटा manipulate करणे, कामचुकारपणा करणे, फसवणूक करणे या गोष्टी गैर आहेत इतकंही साधं वाटू नये इतके निगरगट्ट झालेत.
ज्या समाजात गैर गोष्टी “नॉर्मल” होतात त्या समाजाचं भविष्य ते काय? जो समाज एकीकडे ऋषी-मुनींच्या, संतांच्या, हजारो वर्षांच्या महान परंपरेचा दाखला देतो आणि दुसरीकडे महिलांवरचे अत्याचार, जातीभेद, धार्मिक दंगली, भ्रष्टाचार सहज खपवून घेतो अशा समाजाचे खायचे आणि दाखवायचे दात एकच आहेत असे कसे म्हणायचे?
आपल्याला एक सबळ राष्ट्र बनायचे असेल असेल तर integrity हा आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातला अविभाज्य भाग व्हायला लागेल. तरच ते आपल्या सार्वजनिक आणि राष्ट्रीय आयुष्यात उतरेल. नाहीतर इतिहासाचे गोडवे गाण्यातच धन्यता मानावी लागेल. आपल्याला झोपेतून उठायची नितांत गरज आहे. जय हिंद! 🇮🇳
*इंग्रजीत ज्याला integrity म्हणतात त्याला मराठीत तंतोतंत जुळेल असा शब्द न सापडल्याने नैतिकता हा जवळ जाणारा शब्द वापरला आहे, परंतु तो तंतोतंत जुळत नाही. प्रामाणिकपणा हा शब्द या ठिकाणी वापरला नाही कारण integrity या पैलूचा तो एक उपपैलू आहे; प्रामाणिकपणा म्हणजे integrity नव्हे.
To read more about character and character development in English, read my interviews here: Part 1, Part 2